इराणी वंशाची अभिनेत्री एलनाझ नोरोझी नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. इराणमध्ये हिजाब विरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ एलनाझने बुरखा काढतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
एलनाज नोरोजीने व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले की, प्रत्येक स्त्रीला, जगात कुठेही, ती कुठलीही असली तरी, तिला हवे ते, केव्हा आणि कुठेही कपडे घालण्याचा अधिकार असला पाहिजे. कोणालाही त्याचा न्याय करण्याचा किंवा तिला इतर कपडे घालण्यास सांगण्याचा अधिकार नाही.
प्रत्येकाची मते आणि श्रद्धा भिन्न आहेत आणि त्याचा आदर केला पाहिजे. लोकशाही म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती. प्रत्येक स्त्रीला स्वतःचा निर्णय घेण्याची शक्ती असली पाहिजे, असेही तिने म्हंटले आहे. तसेच, मी कोणत्याही प्रकारे नग्नतेला प्रोत्साहन देत नाही. परंतु, तिच्या निवडीचे स्वातंत्र्याचा प्रचार करत आहे, असेही तिने स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
इराणमध्ये 13 सप्टेंबर रोजी 22 वर्षीय महसा अमिनीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिनं तिच्या डोक्यावर 'योग्य' पद्धतीनं हिजाब घातला नव्हता. ताब्यात घेतल्यानंतर महसा अमिनीला हृदयविकाराचा झटका आला आणि तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. पण, महसा अमिनीच्या कुटुंबीयांच्या मते, पोलीस कोठडीत तिचा छळ केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. याविरोधात इराणमध्ये जबरदस्तीनं हिजाब घालण्याच्या कायद्याला विरोध करण्यासाठी महिला आता सार्वजनिक ठिकाणी निदर्शने करत आपला हिजाब जाळत आहेत. इराणमधील 80 हून अधिक शहरांमध्ये निदर्शनं सुरू असल्याची बातमी आहे.