'रिंगाण' या कादंबरीत प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांच्या परवडीचे अंतर्मुख करणारे चित्र रेखाटणारे नामवंत लेखक कृष्णात खोत यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी बुधवारी साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 24 प्रादेशिक भाषांतील साहित्यासाठी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
कृष्णात खोत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाने ‘कादंबरीकार’ अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ‘गावठाण’, ‘रौंदाळा’, ‘झड-झिंबड’, ‘धूळमाती’, ‘रिंगाण’ या कादंबऱ्यांतून खोत यांनी बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. गावसंस्कृती आणि खेड्यातील बदलता जीवनसंघर्ष हा त्यांच्या लेखनाचा आत्मा आहे. ही कादंबरी ‘शब्द पब्लिकेशन’ने प्रकाशित केली आहे.
मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परीक्षक मंडळात अभिराम भडकमकर, डॉ. संतोष खेडलेकर आणि श्रीमती अनुराधा पाटील यांचा समावेश होता. एक लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. पुरस्कार प्रदान समारंभ 12 मार्च 2024 रोजी कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती श्री के. श्रीनिवासराव यांनी दिली.