सध्या मराठीत अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत. या सर्व चित्रपटांच्या यादीत अजून एका चित्रपटाचे नाव सामिल होणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘राष्ट्र – एक रणभूमी’ असं असून या चित्रपटामध्ये मराठीमधील आघाडीचे कलाकार काम करताना दिसणार आहेत आणि या कलाकारांसोबत महाराष्ट्राच्या राजकारणामधील दोन नावं चित्रपटाच्या दुनियेत पदार्पण करणार आहेत.
या ‘राष्ट्र – एक रणभूमी’ चित्रपटात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. त्यांची या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका असणार हे थोड्याच दिवसांत स्पष्ट करण्यात येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंदरपाल सिंग यांनी केलं असून ‘राष्ट्र – एक रणभूमी’ २६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
या दोन नेत्यांसोबत विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, दिवंगत अभिनेत्री रिमा लागू, संजय नार्वेकर यांसारखे मराठीमधील आघाडीचे कलाकार यामध्ये काम करताना दिसणार आहेत. कोरोनामुळे हा चित्रपट रखडला होता मात्र आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.