प्रसिद्ध सिने अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा आणि भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणी याला सायबर सेलने अटक केली आहे. मंकणी याच्यासह एका महिला आणि इतर 7 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकेच्या खात्यांची 216 कोटींचा डेटा चोरून विकण्याच्या प्रयत्नात ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे दहा आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. त्यांना आयटी क्षेत्रातला जवळपास दहा वर्षांचा अनुभव आहे. तसेच हे काही कंपनीत काम देखील करत होते, त्याच दरम्यान त्यांनी काही चालू आणि बंद असलेली बँक खात्याची माहिती चोरली होती. अशाप्रकारची माहिती एका व्यक्तीला दिली जाणार आहे, अशी माहिती आम्हाला मिळताच आम्ही या टोळीच्या मागावर होतो. मात्र अखेर या टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे. यांच्याकडून पंचवीस लाख रुपये रोख चार चाकी दोन वाहन 11 मोबाईल असा एकूण पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रोहन रवींद्र मंकणी (वय 37, रा. सहकारनगर), सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय 54, रा. सिहंगड रोड), रवींद्र महादेव माशाळकर (वय 34, रा. अंबाजोगाई रोड, बीड), आत्माराम कदम (वय 34, रा. मुंबई), मुकेश मोरे (वय 37, रा. येरवडा), राजेश ममीडा (वय 34, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (वय 45, रा. वाशीम)राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (वय 42, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (वय 40, रा. वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, बँक खात्यांची माहिती चोरल्याप्रकरणी भाजपच्या चित्रपट आघाडीच्या शहराध्यक्षाला अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मुद्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याचीही शक्यता आहे.