शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून मंत्री गुलाबराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात सहाव्यांदा गुलाबराव पाटलांना संधी मिळाली आहे. दरम्यान उमेदवारी मिळाल्याबद्दल गुलाबराव पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले तसच संजय राऊतांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. राज्यात महायुतीच्या 175 जागा निवडून येणार असल्याचा विश्वासही गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की, संजय राऊत यांना शिवसेना संपायची होती म्हणून त्यांनी चाळीस आमदार तिथून पळवले. पैशांवर उमेदवारी देण्याची पद्धत शिवसेनेत नव्हती ती पद्धत राऊतांनी घातली असल्याचा आरोप त्यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सुलभा खोडके यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं ही उमेदवारी यादी जाहीर केली आहे.
भाजपचे माजी आमदार सुरेश धस आज पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. सुरेश धस आष्टी मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छूक असल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सागरवर दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मुरलीधर मोहोळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहेत. पुण्यातील जागावाटपाच्या वादावर चर्चा करणार होणार असल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाने मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत 16 तलवारी, 6 गावठी कट्टे, वाहनासह विदेशी दारू, शेकडो गुंगीच्या नशेच्या बाटल्यांसह आठ आरोपी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
धनंजय मुंडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शक्ती प्रदर्शन होणार नाही असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितले असून अर्ज दाखल करण्यासाठी पंकजा मुंडे आणि महायुती मधील नेत्यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल उपस्थित करत बॅनरबाजी केली आहे. 'आजचा सत्कार, सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस' असा उल्लेख करत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
इंदापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी. प्रवीण माने अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असून शक्तिप्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील गावकऱ्यांनी शपथ घेतली आहे. कुठल्याही राजकीय पक्षांच्या प्रचार, बैठक किंवा सभेला न जाण्याची भूमिका लोणी खुर्द येथील गावकऱ्यांनी घेतली आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. पोलिसांच्या अर्जावर 18 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. अर्जावर सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला जाणार आहे.
वाशिममध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पोहोरादेवीचे महंत सुनील महाराजांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे भेटीची वेळ देत नसल्याचं सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी असल्याची माहिती मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाने ठराव करून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव केला आहे.
सचिन वाझेला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. 100 कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले असून गुवाहाटीवरून मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माजी खासदार निलेश राणे हाती धनुष्यबाण घेणार असून कुडाळमधील मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजच्या सभेत निलेश राणे यांचा पक्षप्रवेश होणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे 28 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असून संदीप देशपांडे यांना वरळीमधून उमेदवारी मिळाली आहे. 24 ऑक्टोबरला वरळीमधील मनसेच्या कार्यालयाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही पहिली यादी जाहीर केली असून 45 उमेदवार जाहीर केले आहेत.