(Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्रिभाषा सूत्रासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. त्रिभाषा सूत्रावरील चर्चा सखोल पातळीवर झाली असून, अंतिम निर्णय साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतर संबंधित घटकांशी सल्लामसलत करूनच घेतला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत राज्यातील विविध परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधितांसमोर एक सुसंगत आणि सर्वसमावेशक सादरीकरण करणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत लागू होणाऱ्या 'ॲकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट' प्रणालीमुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विशेष विचारविनिमय करण्यात आला. त्यानुसार मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, आणि तज्ञांसमोर अभ्यासपूर्ण सादरीकरण करून सल्लामसलत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या पुढील सल्लामसलतीची जबाबदारी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, आणि शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार उपस्थित होते.