उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मंत्रालयातील बैठकीवरुन परत असताना मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील गोंधळावरुन रूद्र अवतार पहायला मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयातील बैठका संपवून देवगिरी बंगल्यावर जाण्यासाठी निघाले असता, मुख्य प्रवेशद्वारावर त्यांची कार आणि सुरक्षा रक्षकांचा समूह तयार नव्हता. ज्यामुळे अजित पवार यांना कारची वाट पहावी लागली.
यावेळेस मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे असलेल्या अजित पवारांकडे त्यांचे चाहते सेल्फीसाठी मागणी करत गर्दी करु लागले. त्यामुळे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. याचा गोंधळाला वैतागून अजित पवारांचा पारा चढला आणि त्यांनी सुरक्षारक्षकांना तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांसमोर दम देत झापझाप झापलं.
अजित पवार रागात म्हणाले की,"बावळटांचा बाजार आहे, कुठे आहेत सगळे? मी खाली आलोय हो कोणाला माहित नाही का?" असं म्हणत अजित पवारांनी सुरक्षारक्षकांना चांगालाच वचक देत खडसावल आहे. अजित पवार ओरडल्या बरोबर सुरक्षारक्षक मंत्रालय आवारात इकडे-तिकडे पळू लागले, मात्र तरी देखील अजित पवारांची कार न आल्यामुळे ते सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या कारमध्ये बसून देवगिरी बंगल्यावर रवाना झाले. हा संपुर्ण प्रकार मंत्रालय आवारात 10 मिनिटांपर्यंत सुरु होता. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांच्या सर्व कार्यालयीन सुरक्षारक्षकांची चांगलीच शाळा घेतल्याचं समोर आलं आहे.