विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीने 46 जागांवर विजय मिळवला. यामध्ये महायुतीत भाजपला 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 16 जागा, ठाकरे गटाला 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.
यातच आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली असून यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हे जे बहुमत त्यांना मिळालं आहे ते साधं नाही. इतकं बहुमत मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आणि सरकार स्थापन व्हायला पाहिजे. निवडणुकीच्या आधी सांगितले जात होते की, 26 तारखेला मुदत संपते आहे विधानसभेची आणि त्यादिशी जर सरकार आलं नाही आमचं जेव्हा आम्ही आशादायी होतो. त्यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लावली जाईल.
आता 26 तारीख उलटून गेली. भारतीय जनता पक्षाला साधारण 140 जागा आहेत असं मी मानतो. बहुमत तुम्हाला लोकांनी कशाकरता दिलं. हे सरकार आता महाराष्ट्रात कधी येईल, त्यांचे राज्य कधी येईल, मुख्यमंत्री कधी होईल याचाबाबत अजूनही राज्यामध्ये संभ्रम आहे. आम्ही अपेक्षा करतो महाराष्ट्राला लवकर एक सरकार मिळेल, मुख्यमंत्री मिळेल आणि कारभार सुरु होईल.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. भारतीय जनता पक्षाची भूमिका गरज सरो वैद्य मरो, वापरा आणि फेका. त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दानंतर आणि शब्द फिरवल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण कसं बदलले हे आपण पाहिलं. भारतीय जनता पक्ष कधी शब्द पाळत नाही. मग तो शब्द खुलेआम दिलेला असो बंद दाराआड दिलेला असो.
भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावे आणि ते लवकरात लवकर मिळावे अशी जर जनतेनं अपेक्षा केली असेल तरी ती चुकीची नाही. असे संजय राऊत म्हणाले.