महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा प्रचार सोमवारी रात्री १० वाजता थांबणार असून, गेल्या काही दिवसांत आरोप-प्रत्यारोपांची धार तीव्र झाली आहे. १० वाजल्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. सत्ताधारी महायुतीत भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट यांच्यात काही ठिकाणी थेट सामना होत असल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. विशेषतः मुंबई उपनगर, तळकोकणातील सिंधुदुर्ग, पालघर आणि अंबरनाथ येथे हा संघर्ष तीव्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यभर सर्वाधिक सभा घेत आश्वासनांचा पाऊस पाडला, तर विरोधी पक्ष काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव सेनेचा प्रचार त्यांच्या समोर फिका पडला. रविवारी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचार दौऱ्यांचे आयोजन केले, तर सोमवारी शेवटच्या दिवशी सभा, रोड शो आणि जनसंपर्क मोहिमा राबवल्या जात आहेत. या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होईल, ज्यात १ कोटी ७ लाख मतदार सहभागी होतील.
राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, 2025’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद 16 अन्वये नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
मतदान दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलिसबल ठेवले जाईल, तर १३,३५५ मतदान केंद्रांवर ईव्हीएमद्वारे मतदान घेतले जाईल. मतगणना ३ डिसेंबरला होईल.
मतदानाची वेळ
मतदानासाठी मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत वेळ दिला गेला आहे. मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संबंधित आचारसंहिता संपुष्टात येईल.