(Maharashtra Weather Update) राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असून आगामी दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात अनेक भागांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज गुरुवारी राज्यातील 20 जिल्ह्यांना तर उद्या शुक्रवारी 22 जिल्ह्यांना हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (30-40 किमी/तास) आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर विशेषतः जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात गुरुवारी हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, शुक्रवारी संपूर्ण मराठवाड्याला यलो अलर्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपिकांचे संरक्षण करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये गुरुवारी व शुक्रवारीही यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली तसेच घाटमाथ्यावरील भागांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे काही भागांत पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क आहे.