महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा -शंभूराज देसाई

Published by : Lokshahi News

गोपाल व्यास | वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतपिकाचे नुकसान पंचनाम्यातून सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

देसाई म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून कारंजा तालुक्यासह मानोरा तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जमा होवून पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांना पंचनामे काळजीपूर्वक करण्याच्या सूचना द्याव्यात. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या प्रत्येक नुकसानीचा समावेश पंचनाम्यामध्ये होणे आवश्यक आहे. तसेच घरांची पडझड, पुरामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

अतिवृष्टीमुळे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्याने ग्रामीण भागातील रस्ते, पुलांचे नुकसान झाले असल्यास जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्वरित तात्पुरती दुरुस्ती करून वाहतुकीचा अडथळा दूर करावा. पाणी पुरवठा योजना नादुरुस्त होवून पाणी पुरवठा खंडित झाला असल्यास सदर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे कारंजा तालुक्यात सुमारे ८९४ हेक्टर व मानोरा तालुक्यातील १० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून त्याविषयीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kokilaben Ambani : मुकेश अंबानी यांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

Latest Marathi News Update live : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; मानाच्या गणपतीची सकाळी 8 वाजता मिरवणुक होणार सुरू

Nagpur Marbat : मारबत मिरवणुकीसाठी नागपूर पोलिसांचा कडक बंदोबस्त; ड्रोन कॅमेऱ्यातून नजर

Monorail : मोनोरेल पुन्हा झाली ओव्हरलोड; 50 प्रवाशांना उतरवलं खाली