मे महिन्यापासूनच सुरु झालेल्या पावसाने एक नवा विक्रम रचला. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्रे, उत्तर भारतातील पश्चिम चक्रावातांचा मध्य भारतापर्यंत दिसून आलेला प्रभाव यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून झालेला बाष्पाचा पुरवठा यामुळे पूर्वमोसमी पावसाने महाराष्ट्रासह देशात मे महिन्यात तडाखा दिला.
जूनमध्ये सुरु होणाऱ्या मान्सूनने यंदा अंदमान, निकोबार बेटांसह, केरळ आणि महाराष्ट्रात मे मध्येचं आगमन केले. त्याचसोबत मान्सूनने दक्षिण भारतासह महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, ईशान्येकडील राज्ये आणि सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागांपर्यंत चांगलीच मजल मारली आहे. त्यामुळे नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने वाटचाल करत एक नवा विक्रम नोंदवला आहे.
मात्र हा प्रवाह पुढील दोन आठवडे म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात अडखळणार आहे. पुढील काही दिवसांसाठी मान्सून दडी मारण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात 172.6 मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद झाली असून, देशभरात 175.7 मिलिमीटर पाऊस झाला आहे. महिन्याच्या शेवटी या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.