(Pune) पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. गाड्या तोडफोडीचे सत्र थांबताना दिसत नाही आहे. सिंहगड रोडवरील हिंगण्यातील खोराड वस्ती भागात ही गाड्या तोडफोडीची घटना घडली. 15 ते 20 तरुणांच्या टोळक्याने परिसरात गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
रात्री सव्वा आठ साडे आठच्या सुमारास म्हसोबा मंदिर परिसराकडून आलेल्या तरुणांच्या हातात कोयते तसेच रोड (लोखंडी गज) होते. त्यांनी वरच्या भागातील गाड्या फोडण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी परिसरातील नागरिकांना धमकाविले. 8 ते 10 दुचाकी, रिक्षाचे नुकसान केले असल्याची माहिती मिळत आहे.
यापूर्वी देखील या भागात अशा तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. मध्यंतरी कोयता गँगने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. अशा घटनांवर पोलिसांकडून कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी ठोस कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.