(Mumbai) महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करत सुमारे 160 टन बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या वस्तू जप्त केल्या आहेत. या कारवाईत चिनी खेळणी, सौंदर्य प्रसाधने आणि बुटांचा समावेश असून एकूण जप्त मालमत्तेची किंमत अंदाजे 6.5 कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने मुंद्रा पोर्ट, हझिरा पोर्ट, कांडला एसईझेड आणि आयसीडी पियाला (फरीदाबाद) येथे एकाचवेळी छापे टाकून 10 कंटेनर्स ताब्यात घेतले. या कंटेनर्समध्ये खेळणी, बनावट कॉस्मेटिक्स आणि बुट अशी विविध उत्पादने होती. विशेष बाब म्हणजे, ही उत्पादने खोटी माहिती देत ‘शोभेच्या वस्तू’ म्हणून जाहीर करून आयात करण्यात आली होती.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, खेळण्यांसाठी आवश्यक असलेले बीआयएस (BIS) प्रमाणपत्र आयातदारांकडे नव्हते. यामुळे ही आयात परदेश व्यापार धोरण 2020 अंतर्गत बेकायदेशीर ठरते. असे प्रमाणपत्र नसलेली खेळणी आयात करणे पूर्णतः प्रतिबंधित असून, अशा वस्तू परत निर्यात कराव्या लागतात किंवा नष्ट केल्या जातात.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सौंदर्य प्रसाधनांनाही कोणतीही अधिकृत मान्यता नव्हती, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. डीआरआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांपासून या प्रकारांची चौकशी सुरू होती. संशयित कंटेनर्सवर लक्ष ठेवून ही संयुक्त कारवाई पार पडली.