विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत यश संपादित केलं. मात्र, सत्तेच्या सारीपाट मांडताना महायुतीमधील घटकपक्षांची मनं राखण्याची कसरत सुरू आहे. मुख्यमंत्री कोण होणार हा महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न सुटला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहखात्यासाठी आग्रह धरला असल्याचं त्यांच्या पक्षातील नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता गृहमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता महायुतीकडून शपथविधीची मुहूर्त ठरला आहे. पहिल्यांदाच महायुतीतील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत अधिकृत घोषणा केली आहे.
महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केलं आहे. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी होणार आहे. LOKशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. अधिकृतपणे शपथविधीची घोषणा झाली असली तरी अद्याप देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपदासाठी नाव हे सुत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, आज पुण्यामध्ये बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली. भाजपाचा मुख्यमंत्री होणार असून महायुतीतील इतर दोन प्रमुख घटकपक्षातील प्रत्येकी एक-एक असे दोन उपमुख्यमंत्री राज्याला लाभणार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली. दुसरीकडे दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. विनोद तावडे आणि जे.पी.नड्डा यांच्यात बैठक सुरू आहे. विनोद तावडे आणि जे.पी.नड्डा यांच्यात जवळपास 1 तास चर्चा झाली. जे पी नड्डा यांच्या घरी महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेवर खलबतं सुरू आहेत. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ५ डिसेंबरला होणार या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा सुरू आहे.
पाहा चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय ट्विट केलं-
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-