राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे गंभीर चित्र उभे राहत असताना, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळताना दिसत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर जोरदार गाजत आहे. हा व्हिडिओ थेट आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून शेअर केला असून, त्यांनी यावरून कोकाटेंवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
"शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना कृषिमंत्री मात्र खेळण्यात व्यस्त आहेत," अशा आशयाचं ट्वीट करीत रोहित पवारांनी राज्य सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. व्हिडिओमध्ये कोकाटे एका ठिकाणी रमी खेळताना स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, "राज्याच्या मंत्रिमंडळात काही जण नेमके कशासाठी निवडून आले आहेत, हे त्यांनाही माहीत नसावे. हे मंत्रिमंडळ जनतेसाठी आहे की फक्त स्वतःच्या फायद्यासाठी?"
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचाही संताप व्यक्त करताना स्पष्ट मत मांडले. "सार्वजनिक जीवनात असणाऱ्या व्यक्तींनी अधिक जबाबदारीने वागायला हवे. खासगी आयुष्य वेगळं असलं तरी सार्वजनिक पदाची प्रतिष्ठा राखणं हे कर्तव्य असतं. जेव्हा शेतकरी संकटात असतो, तेव्हा कृषिमंत्र्यांनी आधार देणं अपेक्षित असतं, ना की रमी खेळणं." राज्यात अनेक भागांत पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीनवर आळी पडल्याच्या तक्रारी आहेत. काही भागांमध्ये बियाण्यांच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. दुबार-तिबार पेरण्यांची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत कृषिमंत्री स्वतःला मोकळा समजून खेळात दंग असल्याचे चित्र अधिकच त्रासदायक ठरत आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा या प्रकारावर नाराजी व्यक्त करत म्हटलं, "कृषिमंत्री जर रमी खेळतात, तर लोकशाहीच्या मंदिराचा अपमान करतात. ही मोठ्या असंवेदनशीलतेची बाब आहे." या संपूर्ण प्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी, लोकप्रतिनिधींचं वर्तन आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. या वादग्रस्त व्हिडिओमुळे सरकारच्या कार्यशैलीवर व प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर आहेत. आत्महत्यांची मालिका थांबत नाहीये. अशा काळात, सरकारच्या मुखिया आणि मंत्रीमंडळाने अधिक जागरूक, सजग आणि उत्तरदायित्व स्वीकारणारे वर्तन करणे, हीच काळाची गरज आहे.