पिंपरी चिंचवड | सुशांत डुंबरे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नेहमीच आपल्या खास शैलीतील वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. आज पिंपरी चिंचवडमध्ये बोलत असतानाही त्यांचाच असाच काहीसा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी आपल्या एका जुन्या चुकीची आठवण करत खास पंच मारले. मी आता बोलताना आता 10 वेळा विचार करतो, कारण एकदा चुकलो होतो त्याची मोठी किंमत मोजली होती. असं म्हणत आपली चूक झाली होती हे अजित पवारांनी मान्य केली.
पाणी टंचाईबद्दल बोलताना अजित पवार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन त्यांच्यावर मोठी टीकेची झोड उठली होती. त्याबद्दल बोलताना आज अजित पवार म्हणाले नेत्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे. मी सुद्धा आता बोलताना 10 वेळा करतो. कारण मागे एकदाच चूक झाली होती, तेव्हा मोठी किंमत मोजली होती. तेव्हा सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 7 पर्यंत चव्हाण साहेबांकडे बसलो होतो, आता नाही चुकायचं आता नाही चुकायचं म्हणत होतो. तेव्हापासून ठरवलं होतं की आता चुकायचं नाही आणि मी तेव्हापासून चुकलो नाही असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांचा हा किस्सा ऐकून अनेकांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर अजित पवार पुन्हा म्हणाले की, तुम्ही कितीही टाळ्या वाजवल्या तरी मी चूकणार नाही. कारण टाळ्या वाजवल्यावर अनेकजण घसरतात. त्यामुळे मी सतत स्वत:ला सांगत राहतो की घसरायचं नाही. यावर पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हशा पिकला.