वक्फ सुधारणा विधेयक आज संसदेत सादर केले आहे. या विधेयकांवरून सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा आमने-सामनेही आले. यावर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेमध्ये एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत
एकनाथ शिंदे म्हणाले की, " वक्फ बोर्डाच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आम्ही सोयीचे राजकारण कधीही करत नाही. सोयीचं राजकारण करणाऱ्या लोकांचा संबध हिंदुत्त्वाशी नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय घेण्याची जागा येते. बाळासाहेबांचे आणि आनंद दिघे यांचे विचार असल्याने आम्ही सर्व निर्णय खुलेआम घेतो. आम्ही दुटप्पी भूमिका कधीच घेत नाही. सडेतोड भूमिका घेतो. काही मूठभर लोकांच्या प्रॉपर्टी ठेवण्यापेक्षा त्यांना अधिक सुविधा कशा मिळतील असा विचार आम्ही करतो. पळपुटी भूमिका कशाला घ्यायची. फायद्याचं घ्यायचं, तोट्याचं सोडायचं. त्यामुळे धरलं की चावतय, सोडलं की पळतंय अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये १०० पैकी २० जागा निवडून आलेल्या आहेत. आगामी निवडणुकांमध्ये जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता बाळासाहेब विचार पुढे घेऊन जातात की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवतात हे बघावं लागेल", असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.