(FASTag Annual Pass ) राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने एक मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. 15 ऑगस्ट 2025 पासून FASTag वापरकर्त्यांसाठी वार्षिक पासची सुविधा सुरू होणार असून, यामुळे टोल प्लाझांवर वारंवार थांबण्याची गरज राहणार नाही. या योजनेत केवळ 3000 रुपयांत एक वर्षासाठी किंवा 200 फेऱ्यांसाठी टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. वेळ आणि पैशाची बचत करणारा हा पास दैनंदिन प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
ही सुविधा केवळ खाजगी कार, जीप आणि व्हॅनधारकांना लागू असेल, तर व्यावसायिक वाहनांना याचा लाभ मिळणार नाही. चुकीची माहिती दिल्यास किंवा गैरवापर झाल्यास पास त्वरित रद्द केला जाणार आहे. संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्ग (NE) नेटवर्कवर हा वार्षिक पास वापरता येणार आहे. त्यामुळे शहरांतर्गत आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सलग टोल प्लाझांवर होणारा त्रास टळेल.
पास मिळवण्यासाठी वाहनधारकांनी हायवे यात्रा मोबाईल अॅप किंवा NHAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणीदरम्यान 3000 रुपयांचे शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर फक्त दोन तासांत हा पास सक्रिय होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे महामार्ग प्रवास अधिक सुलभ आणि जलद होईल, तसेच इंधन आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होईल.