आयुर्वेद (Ayurveda) ही प्राचीन भारतीय वैद्यकीय प्रणाली आहे, जी मानवी आरोग्य आणि शांतीसाठी नैसर्गिक पद्धती आणि तत्त्वज्ञानाचा उपयोग करते. आयुर्वेद जीवनशैली, आहार, वनस्पती औषध आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करते. हेच आयुर्वेद प्राचीन शास्त्र पुढे यावे यासाठी केंद्र सरकार सध्या प्रयत्नशील आहे. त्या दिशेने पुढचे पाऊल म्हणजे केंद्र सरकारने "आयुर्वेद दिवस" देशभर साजरा केला जाणार, असे जाहीर केले आहे.
योग विद्येस प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यानंतर 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा आयुष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. या मंत्रालयामार्फत विविध उपक्रम राबवण्यात आले. पूर्वी धनत्रयोदशी या दिवशी आयुर्वेद दिन जाहीर करण्यात आला होता. पण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये कधीही हा दिवस साजरा केला जात असे. येत्या काळात धनत्रयोदशीच्या तारखा बदलत राहतील आणि हा दिन कधी साजरा होईल, हे निश्चित नसल्यामुळे ही विसंगती दूर करण्याचा निर्णय आयुष मंत्रालयाने केला. त्या अनुषंगाने समितीने चार तारखा निवडल्या. त्यात 23 सप्टेंबर या दिवसाला पसंती मिळाली. या दिवशी दिवस आणि रात्र जवळपास समान असतात. ही घटना नैसर्गिक संतुलनाचे प्रतीक ठरले जाते. हे तत्वज्ञान मन-शरीर-आत्मा यांचा समतोल राखण्यावर भर देणाऱ्या आयुर्वेदाच्या तत्वज्ञानाशी पूर्णपणे जुळते.
या प्रणालीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जागतिक स्तरावर आयुर्वेद दिन साजरा करण्यासाठी 23 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली. आयुष मंत्रालयाच्या या निर्णयामुळे आयुर्वेदिक क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.