राज्यातील 29 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यावर सरकारने अशी घोषणा केली होती की, शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी मदत दिली जाणार. सरकारने 3 हजारांहून अधिक कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती, पण मदतीचा हात अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचला नाही. यामुळे आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत.
लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारणार असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला केला आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "शेतकरी प्रश्नावर 2 नोव्हेंबर ला दुपारी शेतकरी नेत्यांशी अंतरवाली सराटीत चर्चा करणार आहे. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मोठ आंदोलन उभा करायचं आहे. शेतकरी नेत्यांनीच बैठकीला यावं, 2 नोव्हेंबर ला शेतकरी प्रश्नावर अभ्यास असणारे, शेतकरी संघटनाचे पदाधिकारी यांनी यावं".
"सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी 2 नोव्हेंबर ला अंतरवाली सराटीत यावं. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना निमंत्रण देत आहोत. शेतकऱ्यांची सपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत हटायच नाही. शेतकऱ्यांसाठी इमानदारीने लढाई लढू आणि जिंकू सुद्धा... दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, कर्जमुक्ती कशी होत नाही ते आता आम्हाला बघायचं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा हिंडतो हे आम्हाला बघायचं आहे. नुसतं आंदोलन करून मजा नाही, आंदोलन कसं करायचं हे आम्हाला ठरवायचं आहे. आम्ही इमानदारीने लढाई लढून 100 टक्के जिंकू."