पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या उपचारासाठी दहा लाखांची मागणी केली. महिलेचे कुटुंब हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असून देखील महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. शेवटी त्या महिलेला इतर रुग्णालयात हलवत असताना त्या महिलेला त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाला. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान आता या प्रकाराने संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "धर्मादाय आयुक्तांतर्गत येणाऱ्या पुण्यातील रुग्णालयात सात महिन्यांच्या गरोदर महिलेचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला ही अतिशय धक्कादायक घटना आहे. मंत्रालयातून फोन गेला तरी उपचार केला गेला नाही म्हंटल्यावर काय म्हणायचे? गरीब, सामान्य रुग्णांचे हे काय ऐकतील? यातून राज्याच्या आरोग्य यंत्रणांची परिस्थिती काय आहे याचे उत्तर मिळते. धर्मादाय आयुक्तांतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील बहुतांश रुग्णालयांची हीच अवस्था आहे."
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "ज्या रुग्णालयात पैसे दिले नाहीत म्हणून उपचाराअभावी एक महिलेचा मृत्यू होतो त्या रुग्णालयावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्याशिवाय धर्मादाय आयुक्तांतर्गत सुरू असणाऱ्या राज्यातील इतर रुग्णालयांचा देखील एकदा सर्व्हे करायला हवा. ज्या रुग्णालयात असे प्रकार आढळत असतील, त्यांच्यावरही कडक कारवाई करावी." असे जयंत पाटील म्हणाले.