महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष, नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक घडामोड म्हणजे नागपूर खंडपीठाचा ताजा निर्णय. राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची उद्याची ठरलेली मतमोजणी उच्च न्यायालयाने स्थगित करत ती 21 डिसेंबरला घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत परिस्थिती स्पष्ट केली. सध्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. आज मतदानाची प्रक्रिया सुरू असताना न्यायालयाने अचानक एकत्रित मतमोजणीची तारीख बदलण्याचा निर्णय दिला. यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसह पक्ष संघटनांना मोठा धक्का सहन करावा लागला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“नागपूर खंडपीठाचा निकाल मी अद्याप वाचलेला नाही. पण गेली २५-३० वर्षे मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आलो आहे. अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या निवडणुकांच्या निकालाची तारीख बदलण्याची वेळ प्रथमच आली आहे. ही पद्धत योग्य वाटत नाही. तरीही खंडपीठ स्वायत्त आहे आणि त्यांचा निर्णय मान्य करावा लागतो.”
ते पुढे म्हणाले,
“निवडणूक आयोगदेखील स्वतंत्र संस्था आहे. निवडणुकीसाठी झटणाऱ्या उमेदवारांची मेहनत, त्यांचा उत्साह अशा निर्णयांमुळे कमी होतो. व्यवस्थेतील त्रुटींमुळे अनावश्यक अडथळे निर्माण होणं योग्य नाही. पुढे अनेक निवडणूक प्रक्रिया होणार आहेत; आयोगाने त्यासाठी सुधारणा करणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा प्रकारचा प्रश्न पुन्हा उद्भवू नये.”
फडणवीसांनी राज्य निवडणूक आयोगावर काय टिप्पणी केली?
निवडणूक आयोगाचा दोष आहे का, असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले “मी कोणावर थेट चूक टाकणार नाही. मात्र, कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्यासारखे दिसते. आयोगाच्या वकिलांनी नेमकी व्याख्या समजून घेतली नाही असे जाणवते. इतकी वर्षे आम्ही निवडणुका लढवतो, नियम माहिती आहेत. काही ठिकाणी प्रक्रिया व्यवस्थित झाली असतानादेखील एखाद्याने कोर्टात धाव घेतली म्हणून संपूर्ण निवडणुका पुढे ढकलणे पटत नाही. माझी वैयक्तिक नाराजी नाही, ती कायद्याच्या भूमिकेवर आधारित आहे.” उद्याची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली हे योग्य नाही, असेही फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले.