भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘राष्ट्रीय एकता दिन’ निमित्ताने गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि ‘लोहपुरुष’ सदर वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले. या निमित्ताने राष्ट्राला उद्देशून दिलेल्या भाषणात पंतप्रधानांनी एकतेचे चार स्तंभ मांडत, “एकता ही राष्ट्राच्या अस्तित्वाचा आधार आहे आणि तीच विकसित भारताचे सामर्थ्य आहे,” असा ठाम संदेश दिला. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझ्या प्रिय देशवासीयांनो, एकता राष्ट्र आणि समाजाच्या अस्तित्वाचा आधार आहे.
समाजात एकता असेपर्यंत राष्ट्राची अखंडता सुरक्षित राहते.” त्यांनी स्पष्ट केले की, विकसित भारताच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी देशात एकतेला तोडणाऱ्या सर्व षड्यंत्रांना पराभूत करणे आवश्यक आहे. भारतातील राष्ट्रीय एकतेचे हे अनुष्ठान चार मजबूत स्तंभांवर उभे आहे, सांस्कृतिक एकता, भाषिक एकता, भेदभावमुक्त विकास आणि कनेक्टिव्हिटीमुळे मनांची जवळीक.
सांस्कृतिक एकतेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की भारताच्या संस्कृतीने हजारो वर्षांपासून देशाला एक राष्ट्र म्हणून जिवंत ठेवले आहे. “द्वादश ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, चार धाम आणि शक्तिपीठांची परंपरा हीच ती प्राणशक्ती आहे जी भारताला एक चैतन्य राष्ट्र बनवते,” असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की सौराष्ट्र-तमिळ संगम आणि काशी-तमिळ संगम सारखे उपक्रम भारतीय संस्कृतीला जोडणारे पूल आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून भारताने जगाला योगशास्त्राची नवी ओळख दिली आहे. “योग आज लोकांना जोडणारे साधन बनले आहे,” असे त्यांनी सांगितले.
दुसरा स्तंभ सांगताना मोदी म्हणाले, “भारताच्या सैकडो भाषा आणि बोली या आपल्या उघड आणि सर्जनशील विचारसरणीचे प्रतीक आहेत.” त्यांनी स्पष्ट केले की भारतात कधीही कोणत्याही समाजाने किंवा सत्तेने भाषा लादण्याचा प्रयत्न केला नाही. “त्यामुळेच भारत भाषिक विविधतेच्या दृष्टीने जगातील सर्वात समृद्ध राष्ट्र बनले आहे.” ते पुढे म्हणाले “आपण प्रत्येक भारतीय भाषेला राष्ट्रीय भाषा मानतो. तमिळ ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे, आणि संस्कृत ही ज्ञानाची धरोहर आहे. याचा आपल्याला अभिमान आहे.” मोदींनी यावेळी मातृभाषेत शिक्षणावर भर दिला आणि सांगितले की प्रत्येक भारतीयाने इतर राज्यांच्या भाषाही शिकल्या पाहिजेत, कारण भाषाच एकतेचा खरा सूत्रधार आहे.
तिसऱ्या स्तंभावर बोलताना मोदी म्हणाले की गरीबी आणि भेदभाव हे समाजाच्या एकतेसाठी सर्वात मोठे संकट आहे. “देशाच्या शत्रूंनी नेहमी या कमकुवतपणाचा फायदा घेतला आहे. म्हणूनच सरदार साहेब गरीबीच्या विरोधात दीर्घकालीन योजना तयार करू इच्छित होते,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी पटेल यांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले, “जर भारताला स्वातंत्र्य १९४७ च्या दहा वर्षे आधी मिळाले असते, तर देशात अन्नधान्याच्या तुटवड्याचे संकट संपले असते.” मोदींनी सांगितले की गेल्या दशकात सरकारने २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. “घर-घर स्वच्छ पाणी, मोफत आरोग्यसेवा आणि घराची सुविधा आज वास्तवात आली आहे. भेदभाव आणि भ्रष्टाचारमुक्त धोरणे राष्ट्रीय एकतेला बळ देत आहेत,” असे त्यांनी नमूद केले. मोदींनी चौथ्या स्तंभावर बोलताना सांगितले की आज देशात विक्रमी प्रमाणात महामार्ग, एक्सप्रेसवे आणि आधुनिक रेल्वे मार्ग तयार होत आहेत.
“वंदे भारत आणि नमो भारत सारख्या ट्रेन भारतीय रेल्वेचे रूप बदलत आहेत. छोटे शहरही आता विमानसेवांशी जोडले गेले आहेत,” असे ते म्हणाले. त्यांच्या मते, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरमुळे भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. “या विकासामुळे उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम दरम्यानचे अंतर कमी झाले आहे. लोक पर्यटन आणि व्यापारासाठी सहज एकमेकांशी जोडले जात आहेत — हा लोकांमधील जोडणीचा नवा युग आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमादरम्यान मोदींनी पुन्हा एकदा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचे स्मरण केले. त्यांनी सांगितले की स्वतंत्र भारतातील संस्थानांचे विलय करून पटेल यांनी भारताची अखंडता सुनिश्चित केली. “आज आपण त्यांच्या स्वप्नातील विकसित भारताकडे वाटचाल करत आहोत,” असे त्यांनी सांगितले. मोदींच्या भाषणाचा गाभा असा होता की राष्ट्रीय एकता ही केवळ घोषवाक्य नसून, ती प्रत्येक भारतीयाच्या जीवनशैलीचा भाग असली पाहिजे. त्यांनी सांगितले की सांस्कृतिक परंपरा, भाषिक विविधता आणि विकास यांच्या माध्यमातून भारत जगाच्या पटलावर नेतृत्व करत आहे. “एकता ही एका दिवसाची योजना नाही, ती राष्ट्राच्या आत्म्याची ओळख आहे. आपण सर्व मिळून हाच आत्मा जगूया हाच सरदार पटेलांचा आणि विकसित भारताचा मार्ग आहे,” असे मोदींनी आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हटले.