गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना राज्य शासनाने पीओपी मुर्ती आणि मोठ्या 6 फुटांपेक्षा मोठ्या मुर्ती तलावात, समुद्रात विसर्जन करण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर आता पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भातील काही विशेष मार्गदर्शक सूचना शुक्रवारी जारी केल्या आहेत. त्यानुसार 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक आहे. या सूचनांची अंमलबजावणी मार्च 2026 पर्यंत साजऱ्या होणाऱ्या सर्व सण-उत्सवांवर लागू असेल.
पीओपी मूर्तीच्या विसर्जनासाठी मार्गदर्शक सूचना:
पीओपी मूर्तीची विक्री करताना नोंदवही ठेवणे बंधनकारक
मूर्ती विक्रेत्याने ग्राहकाला विसर्जनाची माहितीपत्रिका देणे बंधनकारक
पीओपी मूर्तीच्या मागे ऑइल पेंटने लाल रंगाचे गोलाकार चिन्ह असणे बंधनकारक
गणेश मंडळांना लहान आकाराच्या मूर्ती बसवण्यासाठी प्रोत्साहित करावे
6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या सार्वजनिक मूर्तीना कोणताही पर्याय उपलब्ध नसेल, तर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी मूर्ती विसर्जनासाठी योग्य आकाराचे आणि पुरेशा संख्येने कृत्रिम तलाव तयार करावे.
तलावातील पाणी मूर्तीच्या अपेक्षित क्षमतेच्या 8-10 पट असावे.