सर्वोच्च न्यायालयाने 25 जुलै रोजी 'उदयपूर फाइल्स : कन्हैया लाल दर्जी मर्डर' या चित्रपटावरील स्थगिती वाढविण्यास नकार दिला असून हे प्रकरण पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग केले आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी म्हणाले की "सर्वोच्च न्यायालयाने जे अपेक्षित होते आणि जे योग्य होते ते सांगितले आहे, आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो."
तर चित्रपट दिग्दर्शक भरत श्रीनाते म्हणाले की, "आम्हाला हा चित्रपट 11 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा होता. मात्र आता 8 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित करता येईल, याबद्दल काही दिलासा मिळत आहे. सत्य नेहमीच जिंकते आणि सत्य उभे राहते."
राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल साहू मर्डर केस या सत्यघटनेवर आधारीत 'उदयपूर फाईल्स' हा हिंदी चित्रपट 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली. अमित जानी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अभिनेते विजय राज यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
उदयपूरमध्ये घडलेल्या कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित असलेल्या या चित्रपटाविरोधात आरोपी मोहम्मद जावेद याने याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले होते की, प्रकरणाची सुनावणी अजून न्यायप्रविष्ट असताना चित्रपट प्रदर्शित झाल्यास निष्पक्ष न्यायावर परिणाम होऊ शकतो. मात्र, युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने "तुम्ही हे प्रकरण संबंधित कनिष्ठ न्यायालयात मांडावे", असा सल्ला दिला. तसेच तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. "चित्रपट प्रदर्शित होऊ द्या", असेही न्यायालयाने स्पष्ट सांगितले होते.
हेही वाचा