महायुतीतील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा आक्रमक पवित्रा घेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर तीव्र टीका केली. पक्षप्रवेशाच्या वादामुळे महायुतीत निर्माण झालेला विवाद, पळवापळवी, नाराजी आणि अंतर्गत राडा यावर ठाकरे यांनी नेमकं बोट ठेवत भाजपच सर्वकाही नियंत्रित करत असल्याचा दावा केला. ठाकरे म्हणाले की, महायुतीतील तिन्ही पक्ष प्रत्यक्षात वेगळे नाहीत. नावं आणि निशाण्या भिन्न असल्या तरी शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या भाजपच्या “बी-टीम” असल्याचं ते म्हणाले. मुंबई महापौर पद आणि राज्यातील नेतृत्वाबाबत केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करत त्यांनी सूचित केलं की, दोन्ही सहयोगी पक्ष केवळ नावापुरते स्वतंत्र असून त्यांचा “मालक एकच” आहे.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपली प्रसिद्ध “ॲनाकोंडा” उपमा वापरली. “यापूर्वी मी ॲनाकोंडा म्हटलं होतं. आता महायुतीतील पक्षांना त्याचा अनुभव येऊ लागलाय. शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी गिळल्याशिवाय हा ॲनाकोंडा थांबणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी दिला. महायुतीत सुरू असलेला पक्षप्रवेशाचा राडा, कार्यकर्त्यांची पळवापळवी आणि यामुळे निर्माण झालेलं वातावरण भाजपच्या धोरणाचाच भाग असल्याचा अर्थ त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाला.
निवडणूक प्रक्रियेतील गोंधळावरही त्यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटलं, “या वेळची निवडणूक अत्यंत वाईट अनुभव देणारी आहे. बूथ कॅप्चरचं ऐकलं होतं, आता संपूर्ण निवडणुका ‘कॅप्चर’ केल्या जात आहेत.” सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले असतानाही मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचं त्यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्ट इतर विषयांमध्ये हस्तक्षेप करतं, मग निवडणुकांतील घोळाकडे लक्ष का देत नाही, असा थेट सवाल त्यांनी केला.
गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्ष नेते पद न मिळाल्याबद्दलही ठाकरे संतापले. त्यांनी सरकारवर आरोप केला की, त्यांना विरोधी पक्ष नेते पद द्यायला सरकार घाबरत आहे. इंदू मिल स्मारकाच्या दिरंगाईबाबतही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. ट्रस्ट गेल्या महिन्यातच पुनर्गठीत झाला असे सांगत स्मारकाच्या कामाचा वेग का कमी आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी भव्य स्मारक उभारण्याची मागणी केली उद्धव ठाकरे यांच्या या भाषणाने महायुतीतील तणावाला पुन्हा एकदा जोरदार धार मिळाली आहे. शिंदे–अजितदादा गटावरील त्यांच्या आरोपांमुळे आगामी निवडणुकांपूर्वी राज्याचं राजकीय वातावरण आणखी ढवळून निघण्याची चिन्हे आहे.