कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 1995 सालच्या एका प्रकरणात दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. कागदपत्रं फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला आहे.
यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली. सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी २४ तासांत आमदारकी रद्द केली.
आता, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे?धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही?
यासोबतच ते म्हणाले की, त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली, तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही!सत्ता आहे म्हणून ‘आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड‘ ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय ? असे विजय वडेट्टीवार म्हणाले.