थोडक्यात
जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्यामागचा घटनाक्रम काय?
राजकीय हस्तक्षेपानंतर जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द!
धंगेकरांनी सगळं सांगितलं…
शहरातील मॉडेल कॉलनी येथील जैन समाजाच्या बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव समोर आल्यानंतर शिवसेना शिंदे गट) नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर दररोज नवनवे आरोप करत आहेत. दरम्यान, ज्या गोखले बिल्डर्सने सदर जमीन खरेदीचा व्यवहार केला होता त्यांनी जैन ट्रस्टला ई-मेल पाठवला आहे की 'आम्ही जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करत आहोत.' यावर आता धंगेकर यांनी प्रतिक्रिया देली आहे.
“समाजाला दिलेला शब्द आज खरा ठरला असा वाटतोय. मी आजही विकृतीविरोधात बोलतोय, भाजपविरोधात नाही. निलेश घायवळ कसा पळाला, तो विषय अजून संपलेला नाही. या लढाईत शिंदेंनी मला कुठेही अडवलेलं नाही. शिंदेंचा शब्द खरा ठरला, त्यांचे मी आभार मानतो. चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो,” असं धंगेकर म्हणाले.
राजकीय हस्तक्षेपानंतर जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द!
जैन धर्मियांसह राजकीय स्तरावरून होत असलेल्या विरोधानंतर अखेर रविवारी रात्री गोखले बिल्डर यांच्याकडून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात आला. यानंतर या प्रकरणी आक्रमक पवित्र घेतलेले रवींद्र धंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं होतं. दोन दिवसांत यावर तोडगा निघेल. त्यामुळे हा व्यवहार रद्द झाल्याने मी आनंदी आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील हे पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते. त्या अगोदर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निरोप घेऊन आल्याचा दावाही धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे शाह यांनी चंद्रकांत पाटलांच्या मार्फत मोहोळांना हा व्यावहार रद्द करण्याच्या सूचना दिल्याचं धंगेकरांच्या दाव्यानंतर बोललं जात आहे.
तसेच यावेळी धंगेकर यांनी मोहोळांवर आणखी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, गोखले बिल्डर हा व्यवहार करण्याएवढा मोठा नाही. मोहोळ पुणे महापालिकेच्या स्थायी समीतीचे अध्यक्ष झाल्यानंतर गोखलेच्या संपत्तीत वाढ झाली आहे. मात्र मला या विषयांवर जास्त बोलायचं नाही. कारण मला एकनाथ शिंदे यांनी काहीही बोलायला सांगितलेलं नाही.
मात्र गोखले सारख्या माणसाकडून हा व्यवहार कोण करून घेत होतं? असा सवाल करत धंगेकर यांनी पुन्हा एकदा मोहोळांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी जरी हा व्यवहार रद्द केल्याचा मेल केला गेला असला तरी देखील पूर्ण व्यवहार रद्द होत नाही. तोपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचं म्हटलं आहे. कारण हा व्यवहार ट्रस्टींनी केला आहे. ते पळून गेले तर काय करणार? अशी शंका देखील धंगेकरांनी व्यक्त केली आहे.