डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरातील धोकादायक आदिनारायण कृपा बिल्डिंग आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अचानक कोसळली. यात एक महिला आणि एक पुरुष असे दोन जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी महापालिका ,पोलीस प्रशासन, आणि तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. ३ मजली या इमारतीमध्ये सुमारे 40 कुटुंब राहत होते. मात्र महापालिकेकडून त्या इमारतीला धोकादायक म्हणून जाहीर करून त्यातील कुटुंबांना बाहेर काढण्याची नोटीस बजावली होती. तरी देखील त्या इमारतीमध्ये चार ते पाच कुटुंब राहत होते. तसेच आज सकाळी इमारतीची माती पडत असल्याने महापालिकेने राहत असलेल्या नागरिकांना घर खाली करण्याच्या सूचना केल्या, तरी देखील दोन कुटुंब राहत होते. तेव्हा सायंकाळी साडेचारच्या सुमारास सदर इमारत अचानक कोसळली. त्यात अरविंद भाटकर आणि गीता लोढाया असे दोघे जण अडकले असून त्यांच्या शोध कार्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.