Amul vs PETA | १० कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घालणाऱ्या PETA वर बंदी आणण्याची अमूलची मागणी
देशातील सर्वात मोठी डेअरी कंपनी 'अमूल' आणि प्राण्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लढणाऱ्या 'पेटा' या दोन संस्थांमध्ये 'वेगन मिल्क'वरून सुरू झालेला वाद अजूनच तापत आहे. पेटा या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतातील 10 कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घातला आहे. त्यावर लवकरात लवकर बंदी आणावी, अशी मागणी अमूलचे व्हाईस चेअरमन वालमजी हंबाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
अमूलने गाईच्या दुधाऐवजी वेगन मिल्क उत्पादनाकडे वळावे, असा सल्ला 'पेटा' कडून 'अमूल'ला एका पत्राद्वारे देण्यात आला होता. यावर 'प्लान्ट बेस्ड डेअरी' उत्पादनांकडे वळल्यानंतर देशातील कोट्यवधी नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास कशी मदत मिळणार? असा सवाल 'अमूल'कडून उपस्थित करण्यात आला होता.
पेटाच्या या पत्राला प्रत्युत्तर देताना अमूल कंपनीचे सीईओ आर. एस. सोढी म्हणाले की, "जर अमूल कंपनीनं गाईच्या दुधाचे उत्पादन थांबवलं तर भारतातल्या 10 कोटी शेतकऱ्यांना रोजगार कोण देणार? आपल्याला माहिती नाही का बहुतेक दूध उत्पादक शेतकरी भूमिहीन असतात. त्याच प्रमाणे वेगन दूध तयार करा हा पेटाचा सल्ला म्हणजे भारतातील सहकारी दूध उत्पादक संस्था संपवण्याचे आणि देशातील रोजगार नष्ट करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप देखील अमूलने केला आहे. अमूलसारख्या मोठ्या दूध उत्पादक संस्थेच्या प्रतिमेला तडा द्यायचा आणि त्या माध्यमातून देशातले 10 कोटी रोजगार नष्ट करायचे हा पेटाचा डाव असल्याचा आरोपही अमूलच्या वतीने करण्यात आला आहे.
पेटा इंडियाचे म्हणणे काय आहे ?
वेगन दुधाचे अनेक प्रकार सध्या जगात उपलब्ध आहेत. वेगन दूध हे नारळ, काजू, बदाम आणि मुख्यतः सोया पासून बनवलं जातं. सध्या बाजारात अनेक नागरिक या दुधाला पसंती देत आहेत. गाईच्या दुधापेक्षा वेगन दूध हे जास्त फायदेशीर असतं असा दावा पेटा इंडियानं केला आहे.