Baba Adhav Hunger Strike Called Off : उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी उपोषण घेतलं मागे
पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव यांनी ईव्हीएमविरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरू होतं. आत्मक्लेष आंदोलनाच्या तिसऱ्यादिवशी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. आंदोलनकर्ते बाबा आढाव यांची या नेत्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबा आढाव यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं. बाबा आढावांचे आत्मक्लेश आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे.
राज्यामध्ये सत्तास्थापनेवरून हालचालींना वेग आला असताना बाबा आढाव यांनी पुण्यामध्ये ईव्हीएम मशिनविरोधात आंदोलन पुकारलं होतं. एकीकडे राज्यामध्ये कोण होणार मुख्यमंत्री, शपथविधी कधी, कोणतं खातं कोणाला मिळणार यासारख्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं होतं. तर दुसरीकडे ९५ वर्षीय बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष आंदोलनाचा आज तिसरा दिवस असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावीच लागली.
आज दिवसभरात काय घडलं?
ईव्हीएम हॅक होऊ शकतं: शरद पवार यांनी केला दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज सकाळी आंदोलनस्थळी दाखल झाले. आढाव यांच्याशी चर्चा करून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. EVM हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शेवटच्या 2 तासातील आकडेवारी धक्कादायक आहे. काहींनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन दिलं आहे. निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन होत नाही असं म्हणत शरद पवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. जे काही सुरु आहे ते राज्याला अशोभनीय आहे. लोकांचं मत महत्त्वाचं नाही हे स्पष्ट झालं आहे. महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवर शरद पवार यांनी महायुतीवर निशाणा साधला.
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था, त्यात ढवळाढवळ करता येत नाही: अजित पवार
बारामतीमध्ये आपण दिलेल्या उमेदवाराचा ४८ हजार मतांनी पराभव झाला. ते आपण मान्य केलं. तेव्हा आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. त्यानंतर आता आपण १ लाख मताधिक्क्याने निवडून आलो. जनतेचा ५ महिन्यांत कौल बदलला आहे. ईव्हीएम मशिनमध्ये कसा घोटाळा होतो हे अद्याप कोणीही सिद्ध करून दाखवलं नाही. तसे करून दाखवल्यास निवडणूक आयोगाला जाब विचारण्यात येईल.
बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोडले उपोषण
बाबा आढाव यांना उपोषण सोडण्याविषयी महाविकास आघाडीतील नेत्यांनी विनंती केली. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी उपोषण सोडण्याविषयी विनंती केली. यानंतर बाबा आढाव हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी प्यायले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून आणि बाबा आढाव यांचे सहकारी जे त्यांच्यासोबत उपोषणाला बसले होते त्यांनी "भारत माता की जय" असा नारा सुरु केला.