Union Budget :  निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार; कोणाच्या नावावर आहे सर्वाधिक विक्रम?

Union Budget : निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार; कोणाच्या नावावर आहे सर्वाधिक विक्रम?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विशेष म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प रविवारी सादर होत
Published by :
Varsha Bhasmare
Published on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विशेष म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प रविवारी सादर होत असून, हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत असून, हा त्यांचा एक मोठा विक्रम ठरणार आहे.

2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर 2024 मध्ये एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरही त्यांच्यावरच ही जबाबदारी कायम ठेवण्यात आली. आतापर्यंत त्यांनी पूर्ण अर्थसंकल्प आणि अंतरिम बजेट मिळून एकूण आठ अर्थसंकल्प सादर केले असून, यंदाचा अर्थसंकल्प हा त्यांचा नववा असेल.

यावेळी देश आणि जगासमोर अनेक आर्थिक आव्हाने उभी आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रलंबित व्यापारी करार, अमेरिकेने भारतावर लादलेले टॅरिफ, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेली आर्थिक व राजकीय अस्थिरता या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ‘विकसित भारत’ या संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल वेगाने व्हावी यासाठी या अर्थसंकल्पात महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

कोणाच्या नावावर आहे सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम?

भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मोरारजी देसाई यांनी एकूण 10 वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी 1959 ते 1964 या काळात सलग सहा अर्थसंकल्प मांडले, तर 1967 ते 1969 या कालावधीत चार वेळा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात ते अर्थमंत्री होते.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी विविध पंतप्रधानांच्या कार्यकाळात नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत. तसेच, प्रणव मुखर्जी यांनीही आठ वेळा अर्थसंकल्प मांडले आहेत. मात्र, निर्मला सीतारामन यांचा विशेष उल्लेख यासाठी केला जात आहे कारण त्या एकाच पंतप्रधानांच्या – म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या – कार्यकाळात सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

यामुळे निर्मला सीतारामन या मोरारजी देसाई यांच्या विक्रमाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आहेत. पुढील काळात त्या हा ऐतिहासिक विक्रम मोडतील का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. उद्याचा अर्थसंकल्प केवळ आर्थिक निर्णयांसाठीच नव्हे, तर इतिहासात नोंद होणाऱ्या एका महत्त्वाच्या टप्प्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com