Instagram Update: प्रायव्हसीचा नवा फंडा! ‘Close Friends’ची झंझट संपणार, नव्या फीचरमुळे यूजर्सना पूर्ण कंट्रोल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम त्यांच्या युजर्सची प्रायव्हसी टिकून राहावी यासाठी सतत नवीन फीचर्स आणत आहे. मेटाच्या मालकीचा हा प्लॅटफॉर्म सध्या एका खास फीचरची चाचणी करत असून, त्यात युजर्सना एखाद्या 'क्लोज फ्रेंड्स' लिस्टमधून स्वतः बाहेर पडण्याची सुविधा मिळणार आहे. हे फीचर रिलीज झाल्यानंतर प्रायव्हसीचा पूर्ण कंट्रोल युजरच्या हातात राहणार आहे.
२०१८ मध्ये इंस्टाग्रामने 'क्लोज फ्रेंड्स' लिस्ट सुरू केली होती, ज्यात युजर्स त्यांच्या स्टोरी, रील्स किंवा पोस्ट फक्त निवडक लोकांपर्यंत शेअर करू शकतात. मात्र सध्या जर कोणी तुम्हाला त्यांच्या लिस्टमध्ये जोडले असेल, तर तुम्ही स्वतः बाहेर पडू शकत नाही. आता नव्या फीचरमुळे हे बदलणार आहे. युजरला लिस्टमधून बाहेर पडण्याचा थेट पर्याय मिळेल, ज्यामुळे ते समोरच्या व्यक्तीच्या प्रायव्हेट स्टोरी किंवा रील्स पाहू शकणार नाहीत. पुन्हा लिस्टमध्ये येण्यासाठी समोरच्या व्यक्तीला तुम्हाला पुन्हा जोडावे लागेल.
रिव्हर्स इंजिनीअर अलेसांद्रो पालुझी यांनी या फीचरची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, इंस्टाग्राम अनेक नवीन सबस्क्रिप्शन-आधारित टूल्सवर काम करत आहे. यात अनलिमिटेड ऑडियन्स लिस्ट तयार करण्याची सुविधा, कोणी फॉलो बॅक केले नाही हे तपासण्याचा पर्याय आणि दुसऱ्या युजरला कळल्याशिवाय त्यांच्या स्टोरीज पाहण्याची क्षमता समाविष्ट आहे. ही फीचर्स स्नॅपचॅटप्रमाणे इंस्टाग्रामवरही येणार आहेत.
सध्या चाचणीच्या टप्प्यात असलेले हे फीचर लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल. या बदलांमुळे युजर्सना जास्त सुरक्षित आणि नियंत्रित अनुभव मिळेल, विशेषतः प्रायव्हसी संकट टाळण्यासाठी.
• इंस्टाग्राम क्लोज फ्रेंड्स फीचरमध्ये मोठा बदल
• युजर्स स्वतः लिस्टमधून बाहेर पडू शकणार
• प्रायव्हसी कंट्रोल युजरच्या हातात
• फीचर सध्या चाचणीच्या टप्प्यात
