Jio Network Down: यवतमाळ जिल्ह्यात जिओ नेटवर्क ठप्प, 16 जिल्ह्यांतील कामगारांचा महागाव सावना येथे संप
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
जिओ टेलिकॉम नेटवर्कच्या महाराष्ट्रातील देखभाल आणि दुरुस्तीचे काम सांभाळणाऱ्या प्रताप टेक्नोक्रेट्स प्रा. लि. कंपनीविरोधात १६ जिल्ह्यांतील ४०० ते ५०० कामगारांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सावना येथे संप पुकारला आहे. या संपाचा थेट फटका जिओच्या नेटवर्क सेवेला बसला असून, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, महागाव, उमरखेड, घाटंजी आणि आर्णी या तालुक्यांतील काही भागांत जिओची रेंज पूर्णपणे गायब झाल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कॉल लागणे अशक्य झाले असून इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. संपकर्ते कामगारांनी स्पष्ट केले की, आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. या संपामुळे नेटवर्क दुरुस्ती आणि देखभालीचे कामे पूर्णपणे ठप्प झाल्याने सेवा पूर्ववत होण्यास मोठा विलंब होत आहे.
प्रशासन आणि कंपनी यांच्यात तोडग्याचा मार्ग निघेपर्यंत ही समस्या कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आमच्या प्रतिनिधी संजय राठोड यांनी सावना येथे संपकर्ता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत संयमाने माहिती दिली. या आंदोलनाचा परिणाम केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जिओ ग्राहकांवरही जाणवू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
१६ जिल्ह्यांतील ४००-५०० कामगारांचा महागाव सावना येथे संप.
जिओ नेटवर्क यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांत ठप्प.
इंटरनेट व कॉल सेवा खंडित; ग्राहक त्रस्त.
प्रशासन आणि कंपनीत तोडगा निघेपर्यंत समस्या कायम राहण्याची शक्यता.
