Sonakshi Sinha Horror Experience : "समोर काहीतरी उभं...", त्यावेळी सोनाक्षी सिन्हाला आला भयानक अनुभव
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी ‘निकिता रॉय’ या हॉरर थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रचारादरम्यान तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक भयंकर अनुभव शेअर केला आहे, जो थरकाप उडवणारा आहे. एका मुलाखतीत सोनाक्षीने स्पष्टपणे सांगितले की, ती कधीतरी भूताच्या उपस्थितीचा अनुभव घेतला आहे आणि त्यानंतर ती अशा गोष्टींवर विश्वास ठेवू लागली आहे.
"पूर्वी विश्वास नव्हता पण..."
बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, "मी पूर्वी भुत-प्रेत यावर विश्वास ठेवत नव्हते. पण एक अनुभव असा आला की, तो खरंच खूप भयाण होता. मी झोपेत होते, पण मेंदू जागा होता. डोळे बंद होते, पण असं जाणवत होतं की, समोर काहीतरी उभं आहे. एक सावली जणू माझ्या समोर आहे."
ती पुढे म्हणाली, "सकाळचे सुमारे ४ वाजले असावेत. मी अर्धवट झोपेत होते. मला प्रकर्षाने जाणवू लागलं की, कोणीतरी समोर उभं आहे. पण मी डोळे उघडू शकले नाही. शरीर हलत नव्हतं. एक विचित्र सुन्नता जाणवत होती. सकाळपर्यंत माझे डोळे उघडलेच नाहीत. त्या प्रसंगानं मला प्रचंड धक्का बसला."
‘निकिता रॉय’मध्ये दिसणार सोनाक्षीचा नवा अंदाज
हा अनुभव शेअर करताना सोनाक्षीने स्पष्ट सांगितले की, त्या घटनेनंतर ती भुते-प्रेतांवर विश्वास ठेवू लागली आहे. तिच्या या कथेमुळे चाहत्यांमध्येही एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. सोनाक्षी लवकरच ‘निकिता रॉय’ या हॉरर थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तिचा भाऊ कुश सिन्हा करत आहे. ‘निकिता रॉय’ २७ जून २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सोनाक्षीच्या या खाजगी अनुभवामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. अनेक चाहत्यांनी विचारलं आहे की, "भूत खरंच असतं का?" तर काहींनी याला केवळ एक प्रमोशनल स्टंट म्हणत नाकारलं आहे. मात्र, सोनाक्षीने दिलेलं वर्णन इतकं प्रभावी होतं की, त्या क्षणाचं भय सर्वांनाच जाणवू लागलं.