Chhaava Movie : नाव न घेता किरण मानेंची शरद पोंक्षेवर टीका, म्हणाले, "संभाजीराजांच्या चारित्र्याचे..."

Chhaava Movie : नाव न घेता किरण मानेंची शरद पोंक्षेवर टीका, म्हणाले, "संभाजीराजांच्या चारित्र्याचे..."

किरण माने यांची शरद पोंक्षेवर अप्रत्यक्ष टीका आणि 'छावा' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची यशस्वी कामगिरी. संभाजीराजांच्या चारित्र्यावरून चर्चेचा विषय.
Published by :
Team Lokshahi
Published on

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. 'छावा' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ११ दिवस झाले. आणि या चित्रपटाने भारतामध्ये 300 कोटींचा रुपयांचा गल्ला जमा केला आहे. या चित्रपटाने महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.

या चित्रपटामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका बघायला मिळत आहेत. चित्रपटाची चर्चा सुरु असतानाच मराठी अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर नाव न घेता टिका केली आहे.

काय आहे किरण माने यांच्या पोस्टमध्ये

"तुकोबाराया म्हणतात :

हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ।।

तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।

...ऐरणीवर ठेऊन, त्यावर घणाचा घाव घातला तरी जो भंग पावत नाही - फुटत नाही तोच खरा 'हिरा' !

...घाव सोसूनही टिकणारा तोच मौल्यवान ठरतो. हिर्‍यासारख्या दिसणार्‍या काचेचा मात्र जागेवर चुरा होतो."

पुढे किरण माने लिहितात की, "हा अभंग आठवायचं कारण म्हणजे आज छत्रपती संभाजीराजेंसारखा शूरवीर, बदनामीच्या घणाचे घाव खाऊनसुद्धा अनमोल हिर्‍यासारखा तेजाने लखलखत उभा आहे, त्यांचं सत्त्व भंगलं नाही ! याउलट त्यांना बदनाम करू पाहाणार्‍यांच्या एका दणक्यात फुटून ठिकर्‍या उडाल्या आहेत."

पुढे किरण माने लिहितात की, "'छावा'सारख्या सुंदर सिनेमाचा भक्तपिलावळीनं प्रोपोगंडा म्हणून वापर करण्याचा हैदोस घातला आहे. पण त्याचवेळी काही अशा गोष्टी उघडकीला आल्या की भक्तांचा पर्दाफाश झाला."

पुढे किरण माने लिहितात की, "एका मराठी नटानं हंबरडा फोडलावता, "औरंग्यानं शंभूराजांचा किती छळ केलाय ते पहाण्यासाठी हा सिनेमा बघा रे"... औरंग्या तर नीच होताच... पण याच नटाच्या दैवतानं मात्र छ. संभाजीराजांच्या चारित्र्याचे वाभाडे काढलेले आहेत हे समोर आलं ! थोर साहित्यिक आणि कवी सावरकरांनी 'हिंदूपदपादशाही' या पुस्तकामध्ये संभाजीराजांची शिवरायांचा 'शूर पण नाकर्ता पुत्र' अशा शब्दांत बदनामी केलीय... याच पुस्तकात संभाजीराजांबद्दल ते पुढे म्हणतात, ".... नेतृत्व चालविण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजीमहाराजांमध्ये रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्ती ह्या दुर्गुणांची भर पडली होती."… आता यावर त्या नथूरामी नटाचं काय म्हणणं आहे???"

पुढे किरण माने लिहितात की, "आणि एक… ’छावा’ पाहून ‘धर्मवीर धर्मवीर’ करत छाती बडवणाऱ्या भक्त पिलावळीचे एक ‘गुरुजी’ होते ते. सरसंघचालक गोळवलकर."

पुढे किरण माने लिहितात की "तर हे गोळवलकरजी आपल्या 'Bunch of thoughts' या पुस्तकात लिहीतात - "Sambhaji was addicted to women and wine'... पुढे अजूनही बराच बदनामीकारक मजकूर आहे. नाटककार राम गणेश गडकरीने तर 'राजसंन्यास' नाटकात छ.संभाजीराजेंची अशीच भरपूर बदनामी केलेली आहे. म्हणूनच छ.संभाजी उद्यानातनं त्याचा पुतळा उखडून टाकला होता. अशा काही औरंग्याच्या अवलादी होत्या ज्यांनी शंभूराजांवर क्रूर घाव घातलेत…"

पुढे किरण माने लिहितात की, "आता मला सांगा, हे जे 'छावा' बघुन रागाने डोळे लाल करताहेत... रडून ओरडून धिंगाणा घालताहेत... ते या बदनामीवर गिळून का गप्प आहेत?असो. पण या तिघांनाही देव मानणार्‍यांना आज बळेबळे का होईना छ. संभाजीराजांवर प्रेम दाखवावं लागतंय. भक्तुल्ल्यांच्या दैवतांनी पुस्तकांत लिहीलेल्या शंभूराजांच्या बदनामीच्या सुरळ्या करून त्यांच्या दैवतांच्या तोंडात घुसवाव्या लागत आहेत, हे ही नसे थोडके !"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com