Abdu Rozik : अब्दू रोजिकच्या अटकेमुळे चाहत्यांमध्ये नाराजी, दुबई पोलिसांनी चोरीच्या आरोपावरून केली कारवाई
Dubai Police Arrests Abdu Rojik on Theft Charges : ताजिक गायक आणि बिग बॉस फेम अब्दू रोजिक याच्यावर चोरीचा आरोपावरून दुबई विमानातळामधून त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र कशाची चोरी झाली आहे हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
वयाच्या 21 व्या वर्षीच आपल्या गायन कौशल्याच्या जोरावर अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या अब्दू रोजिकला सलमान खानच्या सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस 16 मध्ये सुद्धा स्थान मिळाले होते. शनिवारी सकाळी 5 वाजता दुबई विमानतळावर उतरल्यानंतर तिथल्या पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी कोणत्या प्रकारची चोरी झाली आहे याबाबत पोलिसांनी काहीही सांगण्यास नकार दिला अशी माहिती अब्दुच्या मॅनेजमेण्ट टीमने सांगितली. सध्या अब्दु दुबईमध्ये राहतो. तिथे त्याचे एक आलिशान घर आहे.हा ताजिकिस्तानचा रहिवासी आहे. बिग बॉसमध्ये अब्दू रोजिकला एंट्री मिळाल्यानंतर त्याच्या भारतातील चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याच्या या लोकप्रियतेमुळे त्याला छोटा भाईजान म्हणूनही लोक त्याला ओळखू लागले.
त्याने बिग बॉसबरोबरच लाफ्टर शेफ्स 2 मध्ये सुद्धा काही काळ आपला सहभाग दर्शवला होता. त्यानंतर काही वैयक्तिक कारणामुळे त्याने हा शो अर्ध्यावरच सोडला. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातही त्याने काम केले आहे. अब्दू 2023 मध्ये 'खतरों के खिलाडी' या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता.अब्दू रोजिक याआधीही बऱ्याच वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 2024मध्ये हॉस्पिटॅलिटी फर्मशी संबंधित मनी लॉन्ड्रींग संदर्भांत इडीने त्याची चौकशी सुद्धा केली होती. मात्र त्यामधून त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. आता कालच्या त्याच्या अटकेमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.