Avatar 3: अवतार ३’मध्ये गोविंदा? व्हायरल व्हिडीओंनी उडवली खळबळ; नेमकं प्रकरण काय?
हॉलिवूडचा बहुचर्चित दिग्दर्शक जेम्स कॅमरूनचा ‘अवतार’ फ्रँचायझीतील तिसरा चित्रपट ‘अवतार : फायर अॅण्ड अॅश’ प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे बॉलिवूड अभिनेता गोविंदा. ‘अवतार ३’मध्ये गोविंदाची एन्ट्री झाली असून तो चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतो, असा दावा करणारे फोटो आणि व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
व्हायरल क्लिप्समध्ये गोविंदाला निळ्या रंगाच्या ‘नावी’ अवतारात दाखवण्यात आले आहे. काही व्हिडीओंमध्ये तो ‘अवतार’च्या पार्श्वभूमीवर त्याचा खास स्टाईलमधील संवाद बोलताना दिसतो, तर एका फोटोमध्ये तो थेट जेक सुलीसोबत स्क्रीन शेअर करत असल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, “खरंच गोविंदा ‘अवतार ३’मध्ये आहे का?” असा प्रश्न विचारला जात आहे.
या चर्चेला कारणही तसंच आहे. काही वर्षांपूर्वी गोविंदाने एका मुलाखतीत ‘अवतार’ चित्रपटासाठी आपल्याला ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला होता. आपणच हा चित्रपट नाकारल्याचं त्याने सांगितलं होतं. त्या वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. त्याच्या पत्नी सुनीता आहुजानेही अप्रत्यक्ष टोला लगावत, “हा चित्रपट कधी ऑफर झाला, याची मला तरी कल्पना नाही,” असं म्हटलं होतं. त्यामुळे ‘अवतार’ आणि गोविंदा हे समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
मात्र, या व्हायरल फोटो आणि व्हिडीओंचं सत्य वेगळंच आहे. तपासणीअंती स्पष्ट झालं आहे की, सोशल मीडियावर फिरणारे सर्व फोटो आणि क्लिप्स हे पूर्णपणे एआय (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेले आहेत. ‘अवतार ३’मध्ये गोविंदाचा कोणताही कॅमियो नाही, तसेच तो या चित्रपटाचा भागही नाही.
एआयद्वारे तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओंमध्ये गोविंदाला अत्यंत वास्तववादी पद्धतीने ‘नावी’च्या रूपात दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञान इतकं प्रगत असल्यामुळे हे दृश्य खरे असल्याचा भास होतो आणि त्यामुळे अनेक प्रेक्षक फसवले जात आहेत. विशेषतः ज्यांनी अजून चित्रपट पाहिलेला नाही, त्यांच्यामध्ये गोंधळ अधिक वाढताना दिसतो आहे.
एकूणच, ‘अवतार ३’मधील गोविंदाची एन्ट्री असल्याचा दावा हा निव्वळ अफवा असून, सोशल मीडियावरील हे व्हायरल व्हिडीओ आणि फोटो फेक आहेत. चाहत्यांनी अशा व्हायरल कंटेंटवर विश्वास ठेवण्याआधी त्याची खात्री करून घेण्याचं आवाहन तज्ज्ञांकडून केलं जात आहे.
