Amit Parab : परबांच्या झीलाचं अभिनयातून 'मन उडू उडू', थेट कोकणातून व्यवसायाचा श्रीगणेशा
झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील अभिनेता अमित परब याने त्याच्या नयन या पात्रासह प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. अमितने आता अभिनयातून थोडा ब्रेक घेत, त्याने कोकण आणि शहरं यांना जोडणारा एक व्यवसाय सुरु केला आहे. त्याने कोकणातील अस्सल फळांचे ज्यूस शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'मालवण स्टाईल' या ब्रँडची स्थापना केली असून फ्रुट ज्युसचा बिझनेस सुरु केला आहे.
त्याच्या या बिझनेसमुळे ग्रामीण भागातील लोकांना फायदा होणार आहे. यामुळे गावातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून शहरातील लोकांना कोकणातील फळांचे अस्सल रस चाखता येणार आहे. त्याने यासंबंधी 'मालवण स्टाईल'ची वेबसाइट तयार केली आहे, ज्यामुळे लोकं ऑनलाईन त्याने तयार केलेले ज्युस मागवू शकतात. कोकणातील स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर पोहोचवणे आणि त्याचसोबत येणाऱ्या पुढच्या काळात शहरातील लोकांना कोकणात बनवलेले आणखी खाद्यपदार्थांचा आनंद घेता येईल, हा या व्यवसायामागचा उद्देश असल्याचं अमितने सांगितलं आहे.
अमितने त्याचं एमबीए पुर्ण केल्यानंतर 7 वर्षे कॉर्पोरेट जॉब केलं. त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात येण्याचं ठरवलं. त्यानंतर तो झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेत नयन या पात्रातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. मालिकत काम करत असताना अमितने त्याच्या कामाचा आनंद घेतला. अभिनय क्षेत्राच्या झगमगाटात असून देखील त्याची कोकणच्या मातीशी नाळ जोडून राहिली. ज्यामुळे त्याने कोकणातून आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला आहे.