Tushar Ghadigaonkar : मराठी मनोरंजन क्षेत्रावर शोककळा ; लोकप्रिय तरुण अभिनेत्याने संपवलं स्वतःचं आयुष्य
मराठी मालिकांमधून आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या तुषार घाडीगावकर याच्या निधनाने मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. भांडूप येथे राहणाऱ्या तुषार याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. काही काळापासून त्याला मानसिक तणाव आणि नैराश्याने ग्रासले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तुषार घाडीगावकरने 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटांमध्येही त्याने काम केले होते. 'सखा माझा पांडुरंग' या अलीकडील मालिकेतही त्याची भूमिका पाहायला मिळाली होती. रंगभूमीवरही त्याचा ठसा होता – 'संगीत बिबट आख्यान' या नाटकात तो झळकला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातून आलेल्या तुषारने मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. त्याच महाविद्यालयातील नाट्यगटातून त्याने अभिनयाची सुरुवात केली होती. त्याच्या अकाली निधनामुळे त्याचे चाहते, मित्रमंडळी आणि संपूर्ण मराठी कलाविश्व सुन्न झाले आहे.