जेव्हा दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका एकमेकांना भेटतात

जेव्हा दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका एकमेकांना भेटतात

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्रने घेतली सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची भेट
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

एका पुरस्कार सोहळ्यात गायिका सावनी रविंद्रने सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर सावनीने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत. सावनीच्या चाहत्यांनी 'दोन‌ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका जेव्हा भेटतात' अश्या कमेंट्स करून त्यांनी सावनीला खूप शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र या भेटी विषयी सांगतात, "माझ्यासाठी हा क्षण स्वप्नवत होता. कारण, आजपर्यंत लहानपणापासून श्रेयाजींची हजारो गाणी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. मला नेहमीच त्यांच्या विविध भाषेतील गाण्यांचं आकर्षण होतं. लता दीदींनंतर श्रेया घोषाल यांना मी माझा आदर्श मानत आले आहे. त्यांच्या हिंदी व्यतिरिक्त तेलुगू मल्याळम अश्या भारतीय भाषेतील गाण्यांची मी पारायणं केली आहेत. मी त्यांची गाणी ऐकून त्या भाषा शिकण्याचा आणि त्या भाषांमध्ये गाण्याचा प्रयत्न केला. हे सगळं मला त्या एका भेटीत आठवल़ं की आपण त्यांची गाणी एका लूपवर खूप वेळा ऐकलीत आणि त्या खुद्द आपल्या समोर आहेत."

पुढे सावनी सांगते, "मला भरून आलं जेव्हा त्या मला स्वतःहून म्हणाल्या, की येस, मी तुला ओळखते, तुला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तेव्हा मी तुला गुगल केलं. तिथे तुझ्याबद्दल संपूर्ण माहिती वाचली. तुझी गाणी ऐकली. तुला ज्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ते गाणं खूप शोधलं. पण मला सापडलं नाही. तेव्हा मी म्हटलं तो सिनेमा अजून प्रदर्शित झालेला नाही. त्यावर त्या म्हणाल्या, तो सिनेमा लवकर प्रदर्शित करा. मी फार उत्सुक आहे ते गाणं ऐकण्यासाठी. तेव्हा मला आनंदाने गहिवरून आलं. श्रेया जी इतक्या मोठ्या गायिका आहेत. पण तरीही त्या फार प्रेमळ आहेत. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी आठवणीत राहणारा होता. माझ्यासाठी ती भेट म्हणजे फॅन मोमेंट होती."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com