Seema Deo : सीमा देव यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द जाणून घ्या...
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी ८० हून जास्त मराठी आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. काही कालावधीनंतर त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे बंद करून केवळ मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
१९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.आणि तिथेच त्यांची रमेश देव यांच्यासोबत भेट झाली. या चित्रपटात त्यांनी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. कालांतराने गोविंद सरय्या दिग्दर्शित ‘सरस्वतीचंद्र’ या हिंदी चित्रपटातही रमेश देव आणि सीमा देव यांनी भाऊ बहिणीची भूमिका साकारली.

त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले. नंदिनी, काळी बायको, जानकी, पोरींची धमाल बापाची कमाल, सर्जा, जिवा सखा, कुंकू या सिनेमांमध्येही त्यांनी चांगल्या भूमिका साकारल्या.

हिंदीतलं त्यांचं काम सांगायचं म्हणजे, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या आनंद या सिनेमातली त्यांची भूमिका छोटी आहे पण लक्षात राहणारी आहे. शिवाय भाभी की चूडियाँ, मर्द, मियाँ बीबी राजी, आँचल, प्रेमपत्र, तकदीर, हथकडी, हे सीमा देव यांचे हिंदी सिनेमेही बरेच गाजले.
काही काळानंतर त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये काम करण बंद केल. आणि केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली . आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला.