Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाचा रौद्र रूपी अवतार; ‘जटाधारा’चा धमाकेदार टीझर रिलीज
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता सुधीर बाबू यांच्या प्रमुख भूमिका असलेला जटाधारा हा सुपरनॅचरल अॅक्शन थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बराच काळ चाहत्यांनी वाट पाहिल्यानंतर या चित्रपटाचा दमदार टीझर 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवा उधाण आला आहे.
टीझर शेअर करताना सोनाक्षी सिन्हाने इंस्टाग्रामवर लिहिले, “बलिदानातून जन्मलेला एक नायक आणि लोभातून वाढलेलं अंधाराचं साम्राज्य, संघर्षाची सुरुवात झाली आहे.” काही क्षणांच्या या व्हिडिओत सोनाक्षीचा जबरदस्त रौद्र लूक पाहायला मिळतो. दागदागिने, लाल टिकली, कपाळावरील ठिपका आणि डोळ्यातील गडद काजळ या सगळ्यामुळे तिचा चेहरा अधिक प्रभावी भासतो. तीव्र अॅक्शन सीन्स आणि सुधीर बाबूसोबतची तिची भिडंत या टीझरचा खास आकर्षण आहे.
वेंकट कल्याण आणि अभिषेक जायसवाल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला जटाधारा हा केवळ अॅक्शन आणि सस्पेन्सने भरलेला नाही, तर भारतीय पौराणिक कथांवर आधारित असल्याने त्यात एक वेगळाच आध्यात्मिक रंगही आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हाचा अलौकिक अवतार तसेच भगवान शंकराची झलक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली होती.
हा चित्रपट जी स्टुडिओ आणि एस के जी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित होत असून, त्यात भव्य व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटाचे संगीत जी म्युझिक कंपनीवर प्रदर्शित होणार आहे. वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणारा जटाधारा हा मोठ्या पडद्यावर व्हिज्युअल ट्रीट ठरणार असल्याची निर्मात्यांची खात्री आहे.