स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा कार्यक्रम बंद पाडण्याचा बजरंग दलाचा डाव
स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा कार्यक्रम बंद करण्यासाठी प्रयत्न झाले. छत्रपती संभाजी नगरातील तापडिया नाट्यगृहात हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हिंदू देवतांवर वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी बजरंग दलाकडून हा राडा करण्यात आल्याच समोर आलं आहे.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मुनव्वर फारुखीचा शो बंद करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत केलेल्या मध्यस्थीने शो पुन्हा सुरू करण्यात आला होता. शनिवारी औरंगाबादच्या निराला बाजार परिसरात असलेल्या तापडिया नाट्यमंदिरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, शो बंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या 5 ते 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
औरंगाबादच्या तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी सायंकाळी 4 वाजता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखीचा शो आयोजित केला गेला होता. हिंदू देवतांवर वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी देशभरात फारुखीवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याच्या शोला सतत विरोध होत असतो.