ShahRukh Khan : किंग खानला 'या' चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर! राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी यांचाही सन्मान
71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या आधारे या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण होणार असून, विविध भाषांतील कलाकार आणि कलाकृतींचा यामध्ये गौरव करण्यात आला आहे.
यंदा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘जवान’ या यशस्वी आणि सामाजिक संदेश देणाऱ्या अॅक्शनपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्याच्या चाहत्यांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण ठरला आहे. राणी मुखर्जी हिलाही पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून, ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ या चित्रपटात एका आईची भावनिक लढाई उभी करणाऱ्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विक्रांत मेस्सी यानेही ‘12th फेल’ या प्रेरणादायी चित्रपटात केलेल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत यश मिळवणाऱ्या तरुणाची कथा या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. सानिया मल्होत्रा हिच्या मुख्य भूमिकेत असलेला ‘कटहल’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडला गेला आहे. सामाजिक व्यंग आणि सत्ताधाऱ्यांवरील उपहासात्मक भाष्य यामुळे या चित्रपटाला समीक्षकांचं विशेष कौतुक लाभलं.
मराठी चित्रपट विभागात ‘श्यामची आई’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. मातृत्व, संस्कार आणि घरातील मूल्यांवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लहान मुलांसाठी बनवलेल्या चित्रपटांमध्ये ‘नाळ 2’ याची निवड झाली आहे. या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये विविध भाषांमधील, सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण विषय मांडणाऱ्या चित्रपटांना सन्मानित करण्यात आलं आहे.