अभिनेत्री वर्षा उसगावकर आता राजकीय आखाड्यात उतरणार
अभिनेत्यांनी राजकारणात उतरणे हे काही नवीन नाही. मराठी सिनेमा आणि मालिका गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर लवकरंच सत्तेच्या खुर्चीसाठी लढणार आहेत.
पुढच्या वर्षी गोव्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे गोव्यात राजकीय घडामोडींना उधाण आलेले असताना वर्षा उसगावकर या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसकडून वर्षा यांच्यावर मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचे बोलले जाते. ममता येत्या 28 ऑक्टोबरपासून गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळीच वर्षा उसगांवकर तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना राजकीय वसाही लाभला आहे, त्या एका राजकीय कुटुंबातील आहेत.
त्यांचे वडील अच्युत के. एस उसगांवकर हे गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मोठे नेते होते. ते गोवा विधानसभेचे उपसभापती आणि एकापेक्षा जास्त वेळा मंत्रिमंडळाचे सदस्य होते. वर्षा उसगावकर यांनी एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली असली, तरी त्या केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर गोव्यातीलही प्रसिद्ध चेहरा आहेत. गोव्यात 75 % हिंदू मतदार आहेत. त्यामुळे वर्षा उसगावकर यांच्या रुपाने हिंदू चेहरा समोर आल्यास, गोव्यात तृणमूल काँग्रेसला फायदा होईल, असे बोलले जाते.