Kamlakar Nadkarni
Kamlakar NadkarniTeam Lokshahi

ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन

नाडकर्णी गेली 50 वर्ष नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत

मुंबई : ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक व दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचं आज निधन झालं आहे. शनिवारी रात्री १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. स्पष्टवक्तेपणा, निर्भीड लेखनशैलीचे समीक्षण ही त्यांची ओळख होती. शेकडो नाटकांवर नाडकर्णी यांनी लिखाण केले आहे.

कमलाकर नाडकर्णी गेली ५० वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत शेकडो नाटकांवर लिखाण केले आहे. रंगभूमीचा प्रत्यक्षानुभव, नाटकाची प्रचंड आवड आणि अभ्यासू वृत्ती यांच्या समन्वयातून त्यांच्यातला समीक्षक घडत गेला. लोकप्रभा या साप्ताहिकातून नाट्य समीक्षा लिहिण्यास त्यांनी सुरूवात केली होती. महानगरी नाटक, राज छत्रपती हे बालनाट्य, नाटकी नाटक ही पुस्तकंही लिहिली आहे.

कमलाकर नाडकर्णी हे सुरूवातीच्या काही वर्षांमध्ये सुधा करमकर यांच्या बालनाट्य संस्थेत लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून कार्यरत होते. बालरंगभूमी पासून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. संगत, अपत्य, पस्तीस तेरा नव्वद, क क काळोखातला, रात्र थोडी सोंगे फार, चंद्र नभीचा ढळला अशा कितीतरी नाटकांसाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. २०१९ मध्ये प्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना अखिल भारतीय नाट्यपरिषदेने जीवनगौरव सन्मान प्रदान केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com