मरणानंतरही नशिबी यातनाच, स्मशानभूमी अभावी पावसातच अंत्ययात्रा
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, सुरगाण्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून, नद्यांना पूर आला आहे.
अशातच सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचयाती अंतर्गत येणाऱ्या ' पिळूकपाडा ' येथे भर पावसात स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कारासाठी प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. तर ग्रामस्थांना डोक्यावर छत्री धरत अंतीम निरोप द्यावा लागला.
मृतदेहावर ताडपत्री धरून कसे बसे सरण रचत संततधार पावसातच चितेला अग्नी देण्याची वेळ मृतांच्या कुटुंबीय व ग्रामस्थांवर आली. माळेगाव ग्रामपंचायतीत माळेगांव, भरडमाळ, केळुणे, सालभोये, पिळूकपाडा, पाथर्डी, पारचापाडा या एकाही गावात स्मशानभूमी शेड नसल्याने मरणानंतर मृतदेहाला येथे नरक येताना सोसाव्या लागत आहे. प्रशासनाने तातडीने येथे स्मशानभूमी शेड उभारून मृतदेहाची अवहेलना थांबवावी अशी मागणी होत आहे.