Christmas: हिरवाई टिकवणाऱ्या 'नाताळ ट्री'चा उत्सव आणि परंपरा; जाणून घ्या
भारतात ज्याप्रमाणे दीपावली घराघरात साजरी केली जाते, त्याप्रमाणे पाश्चिमात्य देशमध्ये उत्साहानी साजरा केला जाणारा सण म्हणजे नाताळ. उत्सवप्रिय भारतीयांनी नाताळला ही आपलंसं केलं यात मोठं आश्चर्य नाही.
तत्वज्ञान सांगण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी त्यातलं तत्व एकच असतं हे पटवून देणारा सण म्हणजे नाताळ. कारण दीपावली प्रमाणे यातही कुटुंब आणि मित्रनी एकत्र येणं, एकमेकांना भेटवस्तू देणं, सगळ्यांनी एकत्र मिळून सहभोजनाचा आस्वाद घेणं आणि मानवतेला प्रेम, दया तसंच शांतीचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्तचं स्मरण करणं हेच महत्त्वाचं असतं. हिवाळ्यामध्ये नाताळ येतो. बऱ्याच देशांमध्ये या सुमाराला बर्फ पडायला सुरुवात झालेली असते. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे बहुतेक सगळ्या झाडांची पान पूर्णपणे गळून गेलेली असली तरी सूचीपर्णी वृक्षात अंतर्भूत होणारी नाताळ ट्री स्वतःची हिरवाई टिकवून दिमाखात उभी असतात. सहाजिकच नाताळ उत्सव हे नाताळ ट्री शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
सध्या घराघरात नाताळ ट्री आणलं जातं. बऱ्याचदा सोयीच्या दृष्टीनी ते कृत्रिम साहित्यांपासून बनवलेलं असतं आणि त्यावरचे दिवे सुद्धा विद्युत असतात पण मूळ परंपरेमधे गावाच्या मध्यभागी असणारं एखादं नाताळ ट्री निवडून, गावातील सर्व लोक तिथे एकत्र जमत असत आणि शुद्ध मधमाशांचे मेणापासून बनवलेली मेणबत्ती पेटवत असत. झाडाच्या आसमंतात पेटवलेल्या खऱ्या मेणबत्तीच्या सुगंधामुळे सर्व प्रकारचे नकारात्मक तरंग, दुष्ट शक्ती यांचा नाश व्हावा ही यामागची धारणा असे.
आजही नाताळ च्या निमित्ताने घरादाराची साफसफाई करून रोषणाई केली जाते, घरात मेणबत्त्या लावल्या जातात, दारात आकाश कंदीलाप्रमाणे तारा टांगला जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज आणि केक्स बनवले जातात. हिवाळ्यातील थंडीचा त्रास होऊ नये उलट शरीर उबदार रहावं आणि अभिसरणाला उत्तेजन मिळावं यासाठी दालचिनी, सुंठ,सर्व मसालेदार, काळी मिरी, लवंग यासारखे मसाले सुद्धा वापरले जातात.